Maharashtra Rain : मोसमी पावसा संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. काही ठिकाणी अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील अशा भागांमध्ये पूरस्थिती तयार झाली.
शेतकऱ्यांच्या पिकांना देखील याचा मोठा फटका बसला. दरम्यान आता पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात चांगला जोराचा पाऊस झाला असून काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून येथील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे. अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक अन भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी मौसमी पावसासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट दिली आहे.
खुळे यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, 29, 30 आणि 31 जुलैला राज्यात पावसाचा जोर थोडा कमी राहणार आहे. म्हणजेच पावसाची उघडीप राहणार नाही पण पावसाची तीव्रता कमी होणार आहे.
खानदेश म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव हे जिल्हे वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये आगामी तीन दिवस म्हणजेच 29 ते 31 जुलै दरम्यान पावसाची तीव्रता कमी राहणार आहे.
या ठिकाणी फक्त मध्यम पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. परंतु एक ऑगस्ट पासून या भागातील काही जिल्हे वगळता पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढणार आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये 3 ऑगस्टपर्यंत मध्यम पाऊस पडणार आहे.
म्हणजे मध्य महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये आणि खानदेशातील तीन अशा एकूण 14 जिल्ह्यांमध्ये 3 ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच मुंबई सह कोकणात पावसाचा जोर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक राहणार आहे. या ठिकाणी खुळे यांनी अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राजधानी मुंबई सह कोकणातील जनतेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे.