Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात गारपीट झाली आहे. दोन ऑक्टोबरला तालुक्यातील मणेराजुरी, योगेवाडी, सावर्डे, यासह अन्य भागात तुफान गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली. याचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला.
तालुक्यातील जवळपास 460 एकरावरील द्राक्ष बागा गारपिटीमुळे भुईसपाट झाल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी उपस्थित केली जात आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 5 ऑक्टोबर 2024 ला खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
आज खानदेशातील धुळे, जळगाव तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
अर्थातच धाराशिव आणि बीड हे दोन जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाड्यात आज पावसासाठी पोषक परिस्थिती आहे. उद्या म्हणजेच 6 ऑक्टोबरला राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, नगर, बीड, सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावासाचा अंदाज देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. खरे तर सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे आणि अशा परिस्थितीत जर जोरदार पाऊस झाला तर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होण्याची भीती आहे.
यामुळे काढणी झालेला शेतमाल शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची देखील विशेष काळजी घ्यावी असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.