Maharashtra Rain : मान्सून काळात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेल्या पावसाने आता मान्सूनोत्तर धुडगूस घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने त्राहिमाम माजवला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी मोठा घातक ठरला आहे.
म्हणजे खरीप हंगामात कमी पावसामुळे आणि आता रब्बी हंगामात जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे आता अवकाळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार हा सवाल बळीराजाकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागातील ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात आता 1 डिसेंबर पर्यंत अर्थातच उद्यापर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे.
म्हणजेच आज आणि उद्या राज्यात अवकाळी पाऊस बरसणार आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यातील हवामान पूर्वपदावर येईल आणि थंडीची तीव्रता हळूहळू वाढत जाईल असा अंदाज आहे.
खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, अमरावती आणि नागपूर विभागातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच संपूर्ण विदर्भात एक डिसेंबर 2023 पर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच खानदेशातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये देखील एक डिसेंबर पर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असे त्यांनी सांगितले आहे.
याशिवाय, उर्वरित महाराष्ट्रात एक डिसेंबर पर्यंत ढगाळ हवामान कायम राहील आणि अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
मात्र त्यांनी या कालावधीत कुठेच गारपीट होणार नाही असे लोकमत या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला सांगितले आहे. तथापि, आज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गारपिट होण्याची आणि वादळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकार लोकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.