Maharashtra Rain : गेल्या जून महिन्यात मोसमी पावसाचा मोठा लपंडाव पाहायला मिळाला. कोकण आणि घाटमाथा परिसर वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पावसाचा जोर हा फारच कमी राहिला. जुलै महिन्याची सुरुवात देखील तशीच निराशा जनक होती. पण, जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.
यामुळे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, राजधानी मुंबईत पावसाने आता पुन्हा एकदा विश्रांती घेतली आहे.
खरे तर मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाचे सत्र सुरू होते. यामुळे मुंबईमधील अनेक भागांमध्ये जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले होते.
पण आता तेथे पावसाने विश्रांती घेतली आहे. विशेष म्हणजे पुढील 24 तास मुंबईत अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. कोकणात देखील जोरदार पावसाने काहीशी माघार घेतली आहे.
पण तरीही अधून मधून कोकणात जोराचा पाऊस बरसत आहे. दक्षिण कोकणात म्हणजेच रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही पावसासाठी पूरक परिस्थिती बनलेली आहे.
अर्थातच या ठिकाणी आगामी काही तास पाऊस हजेरी लावणार आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
प्रामुख्याने सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असून या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरावर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भ बाबत बोलायचं झालं तर येथे पावसाची सर्वाधिक बॅटिंग होणार आहे.
विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वात जास्त राहणार आहे तर उर्वरित ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो.
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. एकंदरीत मुंबई वगळता राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तथापि राज्यातील काही जिल्हे अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.