Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला होता. पण ऑगस्ट एंडिंगला मात्र पावसाने विश्रांती घेतली. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकण, घाटमाथा परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला होता. अगदीच ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळाला. मात्र, ही परिस्थिती सप्टेंबर महिन्यात पूर्णतः बदलणार आहे.
भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट महिन्याप्रमाणे सप्टेंबरच्या सुरुवातीलाही राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज दिला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात प्रत्येक आठवड्याला बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस अशी परिस्थिती संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पाहायला मिळणार आहे.
ऑगस्टमध्ये देखील राज्यात चांगला पाऊस झाला होता अन आता सप्टेंबर मध्येही राज्यात खूप चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. खरे तर सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. यंदा मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास थोडा उशिराने सुरू होणार आहे.
यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत जोरदार पाऊस सुरु राहणार आहे. सप्टेंबर मध्ये गणरायाचे आगमन होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी लागत असते. यंदाही गणरायाच्या आगमनाला पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आयएमडी कडून समोर आला आहे.
कसं राहणार आजच हवामान ?
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट अन मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अमरावती, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम मध्य महाराष्ट्र अन मराठवाड्यात सुद्धा आजपासून जोरदार पावसाची शक्यता आहे.
या भागात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, कोकण, गोवामध्ये आजपासून पुढील पाच-सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी अन पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याला 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 ते 4 सप्टेंबरला आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 सप्टेंबरला जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.