Maharashtra Rain : जुलैच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती. पण आता राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राजधानी मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरावर आणि विदर्भ तथा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
पुणे, मुंबई, रत्नागिरी, लोणावळा, उत्तर महाराष्ट्र, धुळे अन विदर्भातील काही भागांमध्ये पावसाने चांगलाचं दणका दिला असून पुणे वेधशाळेने राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे वेधशाळेने राज्यातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता वेधशाळेने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.
रेड अलर्ट जारी असलेल्या भागातील नागरिकांनी खूपच आवश्यक काम असेल तेव्हाच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर निघू नये असे आवाहन जाणकारांनी केले आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. वेधशाळेने, कोकणातील रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, विदर्भ विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट मिळाला आहे. दक्षिण कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आज पासून 21 जुलै पर्यंत कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस होणार असे आयएमडीने म्हटले आहे. मुंबई, पुणे, ठाणे या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
अर्थातच विदर्भात राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विदर्भातील जनतेला या पावसामुळे दिलासा मिळणार अशी आशा आहे.
खरे तर राज्याच्या विविध भागांमध्ये जून आणि जुलैमध्ये चांगला दमदार पाऊस झाला आहे. मात्र अजूनही असे काही भाग आहेत जिथे मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये एक-दोनदा चांगला मोठा पाऊस झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे.
यामुळे अशा भागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता मात्र हवामान खात्याने 21 जुलैपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. यानुसार जर पावसाने हजेरी लावली तर नक्कीच या सदर भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.