Maharashtra Rain Panjab Dakh : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
एकीकडे राज्यातील काही भागांमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. सूर्यदेव जणू काही आग ओकत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात वादळी पावसाने धुमाकूळ घातलाय.
वादळी पावसामुळे वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थोडासा दिलासा जरूर मिळाला आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावू शकतो. एवढेच नाही तर मंगळवार पर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार असा अंदाज देण्यात आला आहे.
यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे आणि अशातच आता मंगळवार पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाव्यतिरिक्त जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी राज्यात 28 एप्रिल पर्यंत वादळी पाऊस सुरूच राहणार असे म्हटले आहे.
काय म्हणतात पंजाबराव ?
पंजाबरावांनी काल अर्थातच 20 एप्रिल 2024 रोजी आपल्या अधिकृत youtube चैनल वर एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी 20 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे या कालावधीत राज्यातील दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे.
28 एप्रिल पर्यंत राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निश्चितच पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन यावेळी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी केले आहे.