Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर सुट्टीवर गेलेल्या पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. राज्यात सर्वदूर जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. जोरदार पावसाने बळीराजा सुखावला आहे. खरंतर, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर जवळपास सात ते आठ दिवस पाऊस गायब होता. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते.
गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडणार की काय ? अशी भीती त्यांना वाटत होती. पण, 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होण्यास सुरुवात झाली. 17 ऑगस्ट पासून खऱ्या अर्थाने राज्यातील पावसाचा जोर वाढला.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी फारच महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. आगामी 48 तासात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
कुठं पडणार मुसळधार पाऊस?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राजधानी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातही आज पावसाचा जोर अधिक राहील अशी शक्यता आहे.
कोकणातील उत्तरेकडील पालघर, ठाणे आणि दक्षिणेकडील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
याशिवाय, आज उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अर्थातच नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणेसह मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज समोर आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा सुद्धा वाहणार असा अंदाज आहे.
आज मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अर्थातच छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा तसेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील जिल्ह्यात आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा देखील राहणार आहे.