Maharashtra Rain News : मान्सून अंतिम टप्प्यात आला आहे. देशातील विविध राज्यांमधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थान, दिल्ली, हरियाणा यांसह अन्य राज्यांमधून मान्सून माघारी फिरला आहे.
अशातच महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास केव्हा सुरू होणार याबाबतची माहिती हवामान खात्याच्या माध्यमातून समोर येत आहे. खरंतर यावर्षी मान्सूनचे राज्यात उशिराने आगमन झाले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला.
मान्सूनचे उशिराने आगमन झाले यामुळे जून महिन्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. परंतु जून महिन्यातील ही सरासरी जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भरून निघाली. जुलै महिन्यात राज्यातील मराठवाडा विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची हजेरी लागली.
या पावसामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच ऑगस्ट महिन्यात गेल्या 120 वर्षांमध्ये जे घडलं नव्हतं ते घडलं. ऑगस्ट महिन्यात तब्बल वीस दिवस राज्यात पाऊस झाला नाही.
पावसाचा मोठा खंड पडल्याने महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा होता. मात्र सप्टेंबर मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात वातावरणात मोठा बदल झाला आणि विदर्भ पासून ते कोंकण पर्यंत सर्व दूर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला.
या पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागातील धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात कमी पाऊस झाला असल्याने महाराष्ट्रात यंदा अजूनही पावसाने सरासरी गाठलेली नाही.
राज्यात अजूनही सरासरीपेक्षा कमीच पावसाची नोंद आहे. यामुळे जरी महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढलेला असला तरी देखील खरीप हंगामावर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरण्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच पुणे हवामान विभागाने महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू केव्हा होणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास केव्हा सुरु होणार ?
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील विविध भागांमध्ये पाऊस सुरू होता.
पण आता बंगालच्या उपसागरात बदल झाला असून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आज पासून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असून पुणे जिल्ह्यातून आगामी दोन दिवसांत पाऊस परतणार अशी माहिती कश्यपी यांनी यावेळी दिली आहे.