Maharashtra Rain News : तहानलेल्या महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाची, मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने या चालू ऑगस्ट महिन्यात पाऊस पडणार नाही अशी भविष्यवाणी केली होती.
ऑगस्ट महिन्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने या महिन्यात कुठेच पाऊस पडणार नाही असे आयएमडीने नमूद केले होते. मात्र काल अर्थातच शुक्रवारी रात्री हवामानात खूप मोठा बदल झाला आहे.
या बदलाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या माध्यमातून समोर आली आहे. काल रात्री मुंबईमधील काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. राज्यातील इतरही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
अशातच हवामान विभागाने आज अर्थातच शनिवारी 26 ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर यासंबंधीत भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
काय म्हणताय हवामान तज्ञ
याबाबत पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सोनार यांनी सांगितल्याप्रमाणे आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. यासाठी या संबंधित भागांना येल्लो अलर्ट जारी झाला आहे.
विशेष बाब अशी की, विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून तेथील खरीप पिकांना नवीन जीवदान मिळेल असे मत व्यक्त केले जात आहे.
तसेच पुणे आणि आसपासच्या परिसरातही आगामी 3 दिवस हलका पाऊस पडणार असा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना देखील तूर्तास दिलासा मिळणार आहे. हलका जरी पाऊस पडणार असला तरी देखील पुणे व आजूबाजूच्या परिसरातील खरीप हंगामातील पिकाला तूर्तास जीवदान मिळणार आहे.
याशिवाय, पुढील 48 तासांत राज्यातील बहुतांशी भागात हलक्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज आहे. निश्चितच तहानलेल्या महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बातमी राहणार आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांना आणि शेती पिकांना आता मुसळधार पावसाची गरज आहे. यामुळे रिमझिम पावसाने शेतीची गरज भागणार नसल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.