Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात तयार झालेल्या हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण वाढत आहे.
याचाच परिणाम म्हणून आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस बरसणार आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की, मार्च महिन्याचा शेवट हा अवकाळी पावसाने झाला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांनी अर्थातच 5 एप्रिल 2024 पासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज समोर आला आहे.
शुक्रवारपासून पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर चार दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलकां पाऊस हजेरी लावणार असे आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
जर हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान होण्याची शक्यता आहे.
विशेष बाब अशी की, एकीकडे पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे तर दुसरीकडे याच काळात राज्यात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल असा अंदाज देण्यात आला आहे.
IMD ने अस म्हटले आहे की, दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. तसेच, ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जात आहे. हेच कारण आहे की, येत्या 3 दिवसांनी हवेत आद्रता वाढणार आहे.
यामुळे 5 ते 8 एप्रिल या कालावधीत राज्यातील मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसणार असे म्हटले जात आहे. सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
तसेच सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सदर विभागातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
एकंदरीत मार्च महिन्याची सुरुवात जशी अवकाळी पावसाने झाली. तशीच काहीशी सुरुवात एप्रिल महिन्याची होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.