Maharashtra Rain : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील आणि उत्तर कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये गत दोन-तीन दिवसांच्या काळात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव अन देवळा या भागात चांगलाच मुसळधार पाऊस झाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
कांदा, द्राक्ष, डाळिंब, मका या जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला असून आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे आणखीन नुकसान होईल अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. तथापि, सध्या जो पाऊस सुरू आहे त्यामुळे आगामी रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे.
रब्बी हंगामातील गहू हरभरा सहित सर्वच मुख्य पिकांना या पावसाचा फायदा होईल असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवल आहे. दरम्यान आज भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.
आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट मात्र जारी करण्यात आला आहे.
खरे तर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील कमाल तापमान मोठ्या प्रमाणात वाढले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. मात्र परतीचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने राज्याचे कमाल तापमान हे घटले आहे.
यामुळे उकाड्याने हैराण परेशान झालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळत असून आज सुद्धा तापमानात घट येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण की आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून आणखी तीव्र होईल असे संकेत मिळू लागले आहेत. त्यातल्या त्यात बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे नैऋत्य बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता दाट बनली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सुद्धा सक्रिय आहे. यामुळे आज उत्तर कोकणातील पालघर ठाणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तर कोकणातील दोन्ही जिल्ह्यांना आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील दोन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या सदरील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.