Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आजपासून पुढील 6 दिवस राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर भारतात अजूनही थंडीचा जोर पाहायला मिळत आहे.
मात्र, महाराष्ट्रात थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. राज्यात आता किमान आणि कमाल तापमान वाढू लागले आहे. शिवाय आगामी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. एकतर आधीच महाराष्ट्रातील शेतकरी बांधव गेल्या काही महिन्यांपासून पावसाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे बेजार झाले आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि या चालू वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली असल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसाच्या तडाख्यातून रब्बी हंगामातील जी पिके वाचली होती ती पिके आता पुन्हा एकदा अवकाळी पावसात प्रभावित होण्याची शक्यता आहे. आयएमडीने 9 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.
कुठं बरसणार अवकाळी पाऊस ?
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत आहे. हा कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू किनारपट्टी ते मराठवाडा व विदर्भावर सक्रिय आहे.
यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भात मात्र अवकाळी पावसाची शक्यता अधिक आहे.
विदर्भात पावसाचा जोरही अधिक राहणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 10 आणि 11 फेब्रुवारीला अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
दुसरीकडे विदर्भात 10 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. म्हणजे या कालावधीत राज्यातील फक्त कोकण विभागात अवकाळी पाऊस बरसणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.