Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामानात पुन्हा एकदा अमुलाग्र बदल झाला आहे. या बदलामुळे आता ऑगस्ट महिन्याची सुरुवात देखील धो-धो पावसाने होणार आहे.
ऑगस्टमध्येही पावसाचे तांडव पाहायला मिळणार आहे. खरे तर जून महिन्यात राज्यात खूपच कमी पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर वगळला तर जून महिन्यात कुठेच मुसळधार पाऊस झाला नाही.
यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पण, ही परिस्थिती जुलैमध्ये पूर्णपणे बदलली. जुलै महिन्यात राज्यातील पावसाचा जोर खूपच वाढला. गेल्या महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला.
काही ठिकाणी अतिवृष्टीसम पाऊस झाला. यामुळे अनेक भागात पूरजन्य स्थिती तयार झाली आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वसामान्य नागरिकांना देखील या पूरसदृश्य परिस्थितीचा मोठा फटका बसला. दरम्यान आता ऑगस्ट महिन्याची सुरुवातही तशीच होणार असे चित्र तयार होत आहे.
कारण की, भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळाला आहे.
कुठं बरसणार जोरदार पाऊस ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 2 ऑगस्टला राज्यातील विदर्भ विभागात सर्व दूर पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील आणि पूर्व विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यांमध्ये आज ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विदर्भातील या सर्वच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कोकणातही पावसाचा जोर वाढणार आहे. आज कोकणातील दक्षिणेकडील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना अलर्ट मिळाला आहे.
दक्षिणेकडील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज असून या तिन्ही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट मिळाला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर जिल्ह्यालाही आज ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
या दोन्ही जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे. दुसरीकडे आज मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर सर्वात जास्त पाहायला मिळू शकतो असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे. खूपच गरजेचे असेल तेव्हाच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.