Maharashtra Rain Latest Update : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात तर अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे.
ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेला यामुळे खरिपातील पिकांवर मोठे संकट उभे राहिले होते. खरिपातील पिके आता जगणारच नाहीत अशी परिस्थिती तयार होत होती. मात्र आता पुन्हा एकदा पाऊसाला सुरुवात झाली असल्याने खरीप हंगामातील पिकांना नवीन संजीवनी मिळेल, त्यांना जीवदान मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने आजही राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. मात्र बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक हवामान होत आहे.
हेच कारण आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात उकाडा देखील पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात उन्हाचे चटके बसत आहेत. सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर सारखी हिट पाहायला मिळत आहे.
पण असे असतानाही आज राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच विदर्भ विभागात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व अकरा जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाअभावी चिंतेत सापडलेल्या बळीराजाला राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असल्याने मोठा दिलासा मिळत आहे.