Maharashtra Rain : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट तयार झाले आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की, 16 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार वादळी पाऊस आणि गारपीट झाली होती.
या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक या पावसाने वाया गेले होते. अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा तयार होणार की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
कारण की भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने येत्या 48 तासात महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार असा अंदाज यावेळी दिला आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाची रेषा उत्तर तामिळनाडू ते कर्नाटक दरम्यान आहे पण हा कमी दाबाचा पट्टा आपल्या मराठवाड्यावरून जात आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही तास पावसाचे राहणार आहेत. त्यामुळे सदर भागातील नागरिकांना काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
पण, विदर्भात पावसाची शक्यता असली तरी देखील त्या ठिकाणी उष्णतेची लाट येणार असा अंदाज आयएमडीने यावेळी दिला आहे. विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता लक्षात घेता या पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असल्याने तेथील नागरिकांना निश्चितच वाढत्या तापमानापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक राहणार आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण विभागात उष्ण व दमट हवामान पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, वर्धा, यवतमाळ, नागपूर, लातूर, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात येत्या 48 तासात जिल्ह्यातील एखाद-दोन ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज कायम राहणार आहे.
विदर्भात येत्या 48 तासात उष्णतेची लाट येणार असा अंदाज आहे. पुणे व परिसराबाबत बोलायचं झालं तर आगामी 48 तास येथील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज आयएमडीने यावेळी दिला आहे.
एकंदरीत महाराष्ट्रातील काही भागात पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट असे संमिश्र वातावरण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतंय.