Maharashtra Rain : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. एक तर, गेल्यावर्षी मानसून काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत.
यामुळे खरीप हंगामातील पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. पण रब्बी हंगामातून तरी बऱ्यापैकी उत्पादन मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र रब्बी हंगामात आता अवकाळी पाऊस थैमान घालत आहे.
नोव्हेंबर 2023 च्या शेवटी आणि डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे.
यामुळे गहू, हरभरा, कांदा यांसारख्या अनेक पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे झाले असल्याने आता कुठे पीक पुन्हा एकदा उभारी घेत होते. पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात चेंज आला आहे.
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात आगामी काही दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे हवामान खात्याच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.
केव्हा बरसणार अवकाळी ?
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, सहा जानेवारी 2024 नंतर राज्यातील कोकण, मराठवाडा मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
शिवाय महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची देखील शक्यता आहे. यामुळे आद्रता वाढणार आहे परिणामी उकाड्यात सुद्धा वाढ होणार आहे.
हवामानात झालेल्या बदलामुळे गोवा व लगतच्या परिसरात 3 जानेवारी नंतर हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच राज्यात 5 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
मध्य महाराष्ट्रात या कालावधीमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात सहा जानेवारी नंतर हलका पाऊस होईल असे बोलले जात आहे.