Maharashtra Rain : गेले काही दिवस विश्रांतीवर असणारा परतीचा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. खरे तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने आणि ऑक्टोबर चा पहिला पंधरवडा उलटला असतानाही अजूनही महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरलेला नाही.
यामुळे महाराष्ट्रातून मान्सून कधीपर्यंत माघारी फिरणार हा सवाल आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने येत्या दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून माघारी फिरेल असा नवीन अंदाज समोर आला आहे.
परतीचा पाऊस सक्रिय झाल्यानंतर हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गत दोन-तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये परतीच्या पावसाची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळाली. याशिवाय विदर्भातील बुलढाणा, वर्धा, कोकणातील रायगड, ठाणे या जिल्ह्यातही परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.
भारतीय हवामान विभाग काय म्हणतं ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 14 ऑक्टोबरला राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
तसेच उद्या अर्थातच 15 ऑक्टोबरला विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगर, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यात तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.