Maharashtra Rain : महाराष्ट्रातील हवामान गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे बदलले आहे. राज्यात आता ढगाळ हवामान तयार झाले आहे. शिवाय पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
परिणामी, शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आणि चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, कांदा याव्यतिरिक्त फळ पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकरी बांधव अवकाळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार याचीच वाट पाहत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील 48 तास अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. खरे तर काल राज्यातील कोकण विभागासह देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले आहे.
भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर कायम आहे.
देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला असून 11 जानेवारीपर्यंत अर्थातच उद्यापर्यंत या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील 11 जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मराठवाडा विभागात पुढील 48 तास अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
शिवाय आगामी 24 तास कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या काही भागात, आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक, गोवामध्ये हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.
गुजरातच्या पूर्व भागात, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.