Maharashtra Rain : जून महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. पावसाच्या लपंडावामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरात गेल्या महिन्यात नक्कीच चांगला पाऊस झाला आहे. मात्र उर्वरित राज्यात पावसाचा जोर फारच कमी होता. यामुळे अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अशातच, भारतीय हवामान खात्याने जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला होता मात्र जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असे आय एम डी ने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात तब्बल 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106% पाऊस पडणार असे आय एम डी ने स्पष्ट केले असून उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजे 94 ते 104% पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
खानदेशातील जळगाव, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी राहणार आहे. एकंदरीत जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून राजधानी मुंबईत पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आजही राजधानीत पावसाची शक्यता आहे. आज मुंबईसह उत्तर कोकण भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच पुणे आणि कोल्हापूर मध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्यातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी पाच ते दहा जुलै दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होणार याबाबत अपडेट दिली आहे.
खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे या कालावधीत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये म्हणजे सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड या तालुक्यात पावसाचा जोर अधिक राहणार असा अंदाज यावेळी समोर आला आहे.
एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या संबंधित भागातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. जर हवामान खात्याने आणि हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितलेला अंदाज खरा ठरला तर खरीप हंगामातील पिकांना नवीन संजीवनी मिळणार आहे.