Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पण राज्यातील पावसाचा जोर खूपच कमी आहे. येत्या आठ दिवसात सप्टेंबर महिना संपणार आहे. तरीही राज्यातील पावसाची तूट कायमच आहे. अजूनही राज्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. यामुळे संपूर्ण खरीप हंगाम संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे अपेक्षित असा पाऊस पडला नसल्याने आगामी रब्बी हंगाम देखील यामुळे प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.
अशा स्थितीत आता शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव पावसासाठी देवाला नवस करत आहेत. खरंतर गणेशोत्सवाच्या काळात राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला देखील. राज्यातील पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात अक्षरशः ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पण उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच आहे. राज्यात सध्या हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागत आहे. मात्र आता राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 23 सप्टेंबर पर्यंत अर्थातच उद्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
मुंबईसह कोकणात या कालावधीमध्ये जोरदार पाऊल बसू शकतो असे सांगितले जात आहे. शिवाय 24 सप्टेंबर पासून ते 26 सप्टेंबर पर्यंत राज्यातील मुंबई सहसंपूर्ण कोकण, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कालावधीमध्ये राजधानी मुंबई , ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नासिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात उर्वरित महाराष्ट्रात मात्र मध्यम पावसाचा अंदाज आहे. एकंदरीत राज्यात आगामी काही दिवस पाऊस पडणार असा अंदाज आहे. दरम्यान आता हवामान विभागाचा हा तरी अंदाज खरा ठरावा असे शेतकऱ्यांना वाटतं आहे.