Maharashtra Rain : गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पावसाची नोंद झाली. एल निनो या घटकामुळे महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली.
ऑगस्ट 2023 मध्ये तर गेल्या शंभर वर्षात जे घडले नव्हते ते घडले, तब्बल 21 दिवसांपेक्षा अधिकचा काळ पावसाचा खंड ऑगस्टमध्ये पाहायला मिळाला.
यामुळे यंदाचा पावसाळा कसा राहणार? यंदाच्या ऑगस्ट महिन्यातही पावसाचा खंड पडणार का ? यावर्षी सामान्य पाऊस पडणार की सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडणार की गेल्या वर्षी प्रमाणेच दुष्काळाला सामोरे जावे लागणार ? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहेत.
दरम्यान याच संदर्भात आता एका प्रतिष्ठित संस्थेने अंदाज दिला आहे. आशिया – पॅसिफिक इकॉनॉमिक को -ऑपरेशनच्या हवामान केंद्राने भारतातील मान्सूनबाबत सकारात्मकता दाखवली आहे.
या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 2024 मध्ये एल निनो दिसणार नाही. तर ला निनाची स्थिती तयार होणार आहे. याचा परिणाम म्हणून भारतात यंदाचा मान्सून हा चांगला सकारात्मक राहणार आहे.
सदर हवामान संस्थेने यंदा मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. संपूर्ण मानसून काळात चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे.
पण जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात भारतात सामान्य पेक्षा अधिक पाऊस राहणार असे या हवामान संस्थेने म्हटले आहे हे विशेष.
आशिया-पॅसिफिक इकॉनोमिक कोऑपरेशन या संस्थेच्या हवामान केंद्राने पूर्व आफ्रिका, अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर, इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पॅसिफिक या भागात सामान्य पेक्षा अधिकचा पाऊस होईल असे यावेळी आपल्या अंदाजात स्पष्ट केले आहे.
पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या काही प्रदेशांमध्ये सुद्धा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होणार असा या संस्थेचा अंदाज आहे.
निश्चितच, आपल्या भारतात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या मान्सून काळात सामान्य पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने गेल्या वर्षीप्रमाणे ऑगस्ट महिन्यात 21 दिवसाचा पावसाचा खंड यंदा काही राहणार नाही अशी आशा आता व्यक्त होत आहे. यामुळे यावर्षी चांगला पाऊस होईल आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार अशी आशा आहे.