Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता कमी झाली आहे. पण, आता पावसाचा जोर वाढणार आहे. खरंतर, आपल्या शेजारील राज्यात गुजरात मध्ये वादळी प्रणाली सक्रिय आहे. गुजरात मध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे.
पण आपल्या महाराष्ट्रात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने उघडीप घेतली असल्याने राज्यातील बहुतांशी भागांमध्ये उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने यावर्षी मान्सूनचा मुक्काम लांबणार असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होईल आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहील असे म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला आहे.
पण, आज विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज अमरावती, चंद्रपूर, गोंदिया अन गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधीत जिल्ह्यांना आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
मात्र उर्वरित विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणासह महाराष्ट्राच्या बाकीच्या भागात ढगाळ हवामानाची आणि काही भागात ऊन पावसाचा खेळ सुरू राहणार अशी शक्यता आहे.
कोण-कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार?
आज विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पुढील महिन्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. बैलपोळ्याच्या कालावधीत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.