Maharashtra Rain : गेल्या दहा-बारा दिवसांपासून मुंबईसह कोकण, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरु होता. पण आता मुंबईसह राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मध्यंतरी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक धरणांमध्ये अचानक पाणी पातळी वाढली होती आणि यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.
हेच कारण होते की राज्यातील काही भागात पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूरस्थिती पुन्हा एकदा पूर्वपदावर आली आहे. पुरामुळे विस्कळीत झालेले सर्वसामान्य जनजीवन देखील पूर्वपदावर आले असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
मात्र अतिवृष्टी, सातत्याने होणारा रिमझिम पाऊस अन ढगाळ हवामानाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पिकांना या हवामानाचा फटका बसला आहे.
पण आता कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. काल राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळाली. आज देखील राज्यातील अनेक भागांमधून पावसाने उसंत घेतली आहे.
तसेच आणखी काही दिवस राज्यात पावसाची उसंत राहणार असा अंदाज समोर आला आहे. काल सोमवारी मध्यरात्री मुंबईतील काही भागांमध्ये मात्र मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित राज्यात मात्र कुठेच मुसळधार पाऊस झाला नाही.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे 30 जुलैपासून ते 2 ऑगस्टपर्यंत उत्तर कोकणातील पालघर, ठाणे तसेच मुंबईमध्ये या काळात ग्रीन अलर्ट राहणार आहे. म्हणजेच येथे अगदीच हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे.
मात्र कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर या काळात येलो अलर्ट राहणार आहे. म्हणजे या संबंधीत जिल्ह्यातील काही भागांमध्ये या काळात चांगला पाऊस पडणार आहे.
मराठवाड्यात आणि विदर्भात देखील आगामी काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पण, एक ऑगस्ट अन दोन ऑगस्टला मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच या काळात कोकण अन गोव्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भातही एक आणि दोन ऑगस्टला मुसळधार पाऊस पडणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.