Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांमध्ये म्हणजेच एक आणि दोन सप्टेंबरला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ या विभागात जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची तीव्रता अधिक होती. कोकणातील काही जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. मात्र पावसाची सर्वाधिक तीव्रता उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळाली.
काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत.
या अशा संकटाच्या परिस्थितीत शेती पिकांची तात्काळ पाहणी आणि पंचनामे केले जावेत आणि तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम जमा व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
अशातच मात्र भारतीय हवामान खात्याने एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये आयएमडीने महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आता काहीशी कमी झाली असून याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील पावसाचा जोर देखील कमी होणार आहे.
तथापि आज राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.
यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चला तर मग तुमच्या जिल्ह्यात आज हवामान कसे राहणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
कुठं बरसणार मुसळधार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये अर्थातच धुळे, नंदुरबार, जळगाव, विदर्भातील सर्वच्या सर्व 11 म्हणजेचं बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, मराठवाड्यातील जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर अन पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या 19 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
यातील विदर्भातील अमरावती आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तसेच सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो.