Maharashtra Rain : देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाच्या सत्र सुरू होणार आहे. उद्यापासून देशातील काही राज्यांमधील पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील 3 दिवस ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.
म्हणजेच जवळपास 9 ऑक्टोबर पर्यंत या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. ईशान्य कडील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो असा नवा अंदाज हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.
मान्सून परतीच्या वाटेवर असतानाही देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात पुढील काही दिवस पाऊस सुरूच राहणार आहे. पुढील २४ तासांत सहारनपूर, मुझफ्फरनगर, शामली, बागपत, मेरठ, फतेहपूरसह उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि पाऊस पडू शकतो. लखनऊ हवामान विभागाने पुढील २४ तासांत पूर्वांचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जाणवत असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.
पुढील २४ तासांत कोलकातासह दक्षिण बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बेगुसराय, खगरिया, भागलपूर, पूर्व आणि पश्चिम चंपारण, पाटणा, गोपालगंज, सिवान, सारण, नालंदा, जेहानाबाद, शेखपुरा, गया, वाडा, जमुई, लखीसराय, बांका, मुंगेर येथे १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरू असून परतीचा पाऊस जाता जाता महाराष्ट्राला चांगलाच झोडपून काढणार असे दिसते.
कारण की हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पाच ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेणार आहे.