Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळतय.
अशातच, आता भारतीय हवामान खात्याचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. हवामान खात्याने आजपासून पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज राज्यात काही ठिकाणी अगदीचं अतिवृष्टी सारखा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोकणातील दक्षिणेकडील रायगड जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळणार आहे.
तसेच मध्य महाराष्ट्र विभागातील सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस हजेरी लावणार असे आय एम डी ने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि मुंबईला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला देखील जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आय एम डी ने संपूर्ण खानदेश, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावणार असे म्हटले असून या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यात ठिक-ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे उद्यापासून शनिवार पर्यंत राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भ विभागात पाऊस सुरू राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र मराठवाड्यात पावसाचा जोर थोडासा कमी होईल असे आयएमडीने यावेळी नमूद केले आहे. म्हणजेच उद्यापासून मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे.
ज्या ठिकाणी अजून चांगला पाऊस झालेला नाही तिथे सुद्धा जोरदार पाऊस पडणार असा अंदाज समोर आला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.