Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, उर्वरित राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असून त्या ठिकाणी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. काही जिल्हे असे आहेत जिथे मान्सून आगमनानंतर अजून एकदा देखील मोठा पाऊस झालेला नाही.
नागपूर जिल्ह्यात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. एक तर नागपूर जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन हे जवळपास एक आठवडा उशिराने झाले. तसेच मान्सून आगमन होऊन देखील नागपूरात फारसा मोठा पाऊस झालेला नाही.
यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. काल बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले होते. याचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांशी भागात हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.
आज मात्र बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूर्णपणे निवळलेले पाहायला मिळत आहे. परंतु महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती कायम आहे. कारण की राज्याच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा आजही कायम आहे.
यामुळे आज कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर या सदर भागातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान आता आपण कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठं बरसणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टी लगत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पाहता आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे.
रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या दक्षिणाकडील जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
तसेच आज मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि या अनुषंगाने या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील मुंबई सह कोकणातील पालघर ठाणे तसेच जळगाव वगळता संपूर्ण खानदेश, उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना देखील येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.