Maharashtra Rain : पश्चिम विदर्भ आणि परिसरावर गेल्या काही दिवसापासून कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली होती. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. एक आणि दोन सप्टेंबरला महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये अगदीचं अतिवृष्टी सारखा पाऊस झाला.
त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला असून काही धरणे हाउसफुल झाली आहेत. अशातच मात्र पावसाने पुन्हा एकदा ब्रेक लावला आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम विदर्भात आणि लगतच्या क्षेत्रात जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता त्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आता बरीच कमी झाली आहे.
याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रातून पावसाचा जोर ओसरला आहे. पण राज्यातील सर्वच भागांमधून पाऊस गायब होणार नाही तर काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरूच राहणार आहे.
आज चार सप्टेंबरला महाराष्ट्रातील जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार जोराचा पाऊस ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परंतु उर्वरित राज्यात आज फक्त हलक्या पावसाचा अंदाज आहे.
त्यामुळे राज्याच्या उर्वरित भागाला कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाही. आय एम डी नुसार, आज विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, वर्धा, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
खरे तर काल मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. पण, आज अचानक राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे.
तथापि महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला असल्याने ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचले होते त्या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची काळजी घेता येणार आहे. पिकासाठी फवारणीचे नियोजन करता येणार आहे.
विशेषता फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे इत्यादी जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड खोळंबली आहे. या कांदा लागवडीला सुद्धा आता गती मिळणार आहे.