Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याचे रिटायर्ड शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी 10 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आज आपण खुळे यांनी सांगितलेला हाच हवामान अंदाज अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान?
राज्यात एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस झाला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या महिन्याचा शेवटचा संपूर्ण आठवडाभर हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले. फक्त काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता.
मात्र 31 ऑगस्टच्या मध्यरात्री नंतर पावसाने गिअर ओढला. एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागली. काही ठिकाणी अतिवृष्टी सारख्या पावसाची नोंदही करण्यात आली.
यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर विपरीत परिणाम झाला असून अनेक भागांमध्ये सोयाबीन, कापसासारखे महत्त्वाची पिके प्रभावित झाली आहेत. पण आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे.
चार आणि पाच तारखेला राज्यातील काही भागांमधून पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. अशातच, आता माणिकराव खुळे यांनी दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात जोराचा पाऊस होणार या संदर्भात माहिती दिली आहे.
खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, 10 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 10 सप्टेंबर पर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे.
तसेच या जिल्ह्यांमधील काही भागात अगदीच तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये मात्र अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अन हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोकणाबाबत बोलायचं झालं तर कोकणातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 10 सप्टेंबर पर्यंत अति जोरदार पावसाची शक्यता आहे. अर्थातच कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
यासोबतच भारतीय हवामान खात्याने धुळे, नंदुरबार, जळगाव या खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये, नागपूर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये अन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यामध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.