Maharashtra Rain : परतीच्या पावसा संदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने परतीचा पाऊस लांबला असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान परतीचा पाऊस लांबला असल्याने आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या देखील राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यात जवळपास 15 ते 16 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या संबंधित जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आय एम डी नुसार येत्या दोन दिवसात झारखंड बिहारच्या उर्वरित भागातून, महाराष्ट्र अन छत्तीसगडच्या आणखी काही भागातून, ओडिशा अन वेस्ट बंगाल सिक्कीमच्या काही भागात परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर एक ठळक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
यामुळे आज राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यात देखील आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या सदर विभागातील जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये आज कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र विभागातील अहिल्यानगर, धुळे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, विदर्भ विभागातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे या सदरील भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या पावसामुळे खरीप हंगामातील अंतिम टप्प्यात आलेल्या शेती पिकांची नुकसान होणार आहे. फळबागांसाठी देखील हा पाऊस घातक ठरण्याची शक्यता आहे. मात्र या पावसाचा पुढील रब्बी हंगामाला फायदा होईल असे जाणकारांचे मत आहे.
रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पेरणीच्या वेळी हा पाऊस वरदान ठरेल असे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात. एकंदरीत हा पाऊस काही अंशी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे तर काही अंशी यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा होऊ शकते.