Maharashtra Rain : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस होत आहे. काल राज्यातील दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी सह घाटमाथा आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी समान पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
खरंतर मध्यंतरी पावसाने दडी मारली होती. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. निश्चितच काही भागात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.
विदर्भातील नागपूर जिल्ह्यात तर मान्सून आगमनानंतरही जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. नागपूर सारखीच परिस्थिती राज्यातील अन्य काही भागातही पाहायला मिळत आहे.
तर काही ठिकाणी मान्सूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला आहे मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे पेरणी झाल्यानंतर तेथील शेतकरी संकटात आले आहेत.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने अरबी समुद्रात पावसाचे ढग दाटून आले आहेत अन यामुळे महाराष्ट्रात मोसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज जारी केला आहे.
भारतीय हवामान खात्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान आता आपण आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार ? याबाबत थोडक्यात माहिती पाहूया.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये अर्थातच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या घाटमाट्यावर देखील जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग येथे ठीक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सुद्धा आज ठीक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने आज सातारा, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळाला आहे.
विशेष बाब अशी की, आज विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असा अंदाज देण्यात आला आहे.