Maharashtra Rain : जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा मोठा लपंडाव पाहायला मिळाला. राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या महिन्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. कोकण आणि घाटमाथा परिसर वगळता राज्यातील उर्वरित भागात पावसाचा जोर फारच कमी राहिला होता. महाराष्ट्रात गेल्या महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची हजेरी लागली.
त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने जुलै महिन्यात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जुलैमध्ये राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
मात्र जुलैचा पहिला आठवडा उलटला असतानाही राज्यात जोरदार पाऊस झालेला नाही. अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
आकाशात ढगांची दाट गर्दी होत आहे मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. जोरदार पाऊस कधी होणार? अशी विचारणा सुरु आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे. आज अर्थातच सात जुलै रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज मराठवाड्यातील जालना, लातूर, धाराशिव, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
याशिवाय, नंदुरबार वगळता खानदेशातील उर्वरित दोन जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
निश्चितच हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आणि या संबंधित भागात चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा या निमित्ताने पुन्हा एकदा पल्लवीत होतील असे म्हटले जात आहे.