Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील अनेक भागांमधून पाऊस जवळपास गायब झाला आहे. पण, राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानासहित तुरळक पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे.
अशातच आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. भारतीय हवामान खात्याने 21 सप्टेंबर, 22 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबरला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
खरंतर सप्टेंबर च्या सुरुवातीला राज्यात चांगला पाऊस झाला होता. एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. यानंतर सात सप्टेंबर पासून ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस झाला. तदनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो
हवामान खात्याने आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेली अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर अखेर कार पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असे म्हटले आहे. आता आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
21 सप्टेंबर : महाराष्ट्रात मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात होणार आहे. आज मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने मराठवाड्यातील या संबंधित जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
22 सप्टेंबर : उद्या अर्थातच 22 सप्टेंबरला मराठवाडा अन विदर्भ विभागात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, उद्या मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, धाराशिव अन विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
23 सप्टेंबर : हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे 23 सप्टेंबरला मराठवाडा विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड व विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मराठवाडा आणि विदर्भातील या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.