Maharashtra Rain : गेली अनेक दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केला आहे. जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती यंदाही उद्भवणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली होती. मात्र तसे काही झाले नाही जुलैचा पहिला आठवडा उलटला आणि पावसाने जोर पकडला.
जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर कोकण आणि घाटमाथ्यावर पुन्हा एकदा जोराचा पाऊस झाला. यानंतर पुन्हा पाऊस थोडासा थबकला. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जबरदस्त कमबॅक केले असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
राजधानी मुंबईत तर जोरदार पावसामुळे सर्वत्र दाणाफान झाली आहे. मुंबई सारखीच परिस्थिती संपूर्ण कोकणात, उत्तर महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा थोडासा जोर वाढलेला आहे. अशातच आता हवामान खात्याने आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा नवीन अंदाज जारी केला आहे.
कुठे बसणार जोरदार पाऊस?
आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे तथा सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या संबंधित भागांसाठी चक्क रेड अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भाबाबत बोलायचं झालं तर विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे. या अनुषंगाने यातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग अन मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट मिळाला आहे. येथे ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे.
बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्रमधील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. मात्र मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असे मत आय एम डी च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे.
एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षात असणाऱ्या बहुतांशी भागातील शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना यामुळे नव संजीवनी मिळणार आहे. या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शेती कामांना वेग येणार आहे.