Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे. तहानलेल्या महाराष्ट्राला अवकाळी पाऊस नवसंजीवनी देईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
यंदा महाराष्ट्रात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला आहे. या चार महिन्यांच्या काळात सरासरीच्या तुलनेत जवळपास 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागांमध्ये आत्तापासूनच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. काही गावांमध्ये तर पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत आहे.
आगामी काही दिवसात ही परिस्थिती आणखी भीषण होईल आणि ऐन हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर लावावे लागतील असे सांगितले जात आहे.
अशातच मात्र आता राज्यात 25 नोव्हेंबर पासून ते 27 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. यामुळे तहानलेल्या महाराष्ट्राची तहान हा अवकाळी पाऊस भागवेल अशी भोळी-भाबडी आशा लागली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मालदीव ते दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
या हवामान प्रणालीमुळे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील 22 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संबंधित जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस
25, 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी राज्यातील कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
याशिवाय मध्य महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि धाराशिव या जिल्ह्यात आणि विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच महाराष्ट्रातील उर्वरित भागातही पावसाचा अंदाज आहे.