Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागात अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील काही प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. काही धरणे फुल भरली असून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
तथापि मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. पुरसदृश्य परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून पावसाचा जोर अखेर कधी ओसरणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. पण राज्यातील पूरस्थिती आता नियंत्रणात आली आहे.
अनेक ठिकाणी पूरस्थिती निवळली असून पुन्हा एकदा सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर येऊ पाहत आहे. यासाठी शासन आणि प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आले आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने आज अर्थात 27 जुलैला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये धो धो पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता आय एम डी ने आज राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. मात्र आय एम डी ने उद्यापासून अर्थातच 28 जुलै पासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरणार असल्याची माहिती देखील यावेळी दिली आहे.
यामुळे ज्या भागात पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे, तेथील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज दक्षिण कोकणात अर्थातच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या संबंधित भागासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरात देखील पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात म्हणजेच ठाणे जिल्ह्यातही पाऊस पडणार आहे या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी येथेही पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून यामुळे मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती तयार झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील पूरस्थिती पाहायला मिळत आहे.
आज मात्र मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी राहू शकतो असे वाटत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमधून उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार असे सांगितले आहे.