Maharashtra Rain : दीपोत्सवाचा सण नुकताच साजरा झाला आहे. मात्र तरीही महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचा संकट कायमचं आहे. दिवाळी उलटल्यानंतरही महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असून थंडीची तीव्रता वाढत नाही.
याउलट राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे चिंता वाढत असून भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज दिला आहे.
खरे तर दिवाळीच्या काळातही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. वसुबारस पासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होता. भाऊबीजेच्या दिवशी देखील राज्यातील काही भागात पावसाने दणका दिला.
दिवाळीच्या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, आज 4 नोव्हेंबर 2024 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विधानसभा कडकडाट होईल आणि पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
आज कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला असून या अनुषंगाने या संबंधित दोन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. याशिवाय आज चार नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर आज या विभागातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
तसेच, आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड या 2 जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या सदरील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.