Maharashtra Rain : राज्यात जून महिन्यात पावसाची तीव्रता फारच कमी होती. जुलै महिन्याची सुरुवातही खूपच निराशाजनक राहिली. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत होते. सर्वत्र जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
काही भागात अगदीच अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असून या अतिमुसळधार पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील नुकसान केले आहे. सध्या राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
अनेक भागात पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत असून काही धरणांमधून आता पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे.
पुणे, कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली असून नागरिक अडचणीत सापडले आहेत. कोकणातही अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
यामुळे आता शासन आणि प्रशासन देखील ऍक्शन मोड वर आले आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
हवामान खात्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, मध्य महाराष्ट्रातील सातारा तसेच दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची तीव्रता अधिक राहणार असून या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.
या भागातील नागरिकांनी या काळात विशेष सावध राहणे अपेक्षित आहे. खूपच गरजेचे असेल तेव्हाच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील जाणकारांनी केले आहे.
तसेच आज राजधानी मुंबईसह कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच आज जळगाव, अहमदनगर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.