Maharashtra Rain : नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातून थंडीचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आद्रतेमध्ये होणारी वाढ आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातला थंडीचा जोर काहीसा कमी होणार आहे. खरे तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात किंचित वाढ पाहायला मिळाली आहे.
यामुळे राज्यातील गारठा आत्ताच कमी झाला आहे. शिवाय उद्यापासून थंडीचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने एक जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाचे अपडेट दिली आहे.
आय एम डी नुसार नववर्षाच्या सुरुवातीला मुंबईसह संपूर्ण कोकणातून थंडी गायब होण्याची शक्यता आहे. या संबंधित भागांमध्ये 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान आकाश ढगाळ राहणार आहे. ढगाळ हवामानामुळे येथील थंडी कमी होणार आहे.
विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते असे देखील मत काही हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात एक जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान काही ठिकाणी किंचित ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ स्वरूपाच्या हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात मात्र आकाश निरभ्र राहणार असून या ठिकाणी हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे सांगितले जात आहे.
मराठवाड्यात कुठेच ढगाळ हवामान राहणार नाही आणि अवकाळी पाऊस पडणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सकाळचे किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान 30°c एवढे नमूद केले जात आहे.
विशेष म्हणजे एक ते सात जानेवारी 2024 या कालावधीत अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळणार आहे. एकंदरीत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढणार आहे. एक तर आधीच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान आता नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने होणार असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढू शकते असे सांगितले जात आहे. तथापि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाचा जोर हा खूपच कमी राहणार आहे मात्र ढगाळ हवामान आणि किरकोळ स्वरूपाचा पडणारा अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी घातक ठरू शकतो असे बोलले जात आहे.