Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रात वळवाचा पाऊस सुरू आहे. मागील दोन आठवड्यांपासून राज्यात अवकाळी पावसाच तांडव सुरु आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली नंतर मध्य महाराष्ट्रात देखील गारपिटीचे सावट पाहायला मिळाले.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत.
आधीच नैसर्गिक संकटामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. एकतर गेल्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाहीये. सोयाबीन, कापूस अगदी कवडीमोल दरात विकला जात आहे.
कांद्याच्या बाबतीतही तशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. दुसरीकडे आता या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा पूर्णतः हतबल झाल्याचे चित्र आहे.
राज्यात गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून वादळी पावसाचे सत्र सुरू असून काही भागात उष्णतेची लाट येत आहे. अनेक भागात तापमान ४३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. एवढेच नाही तर काल विदर्भ विभागातील अकोला येथे 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
कदाचित हे या हंगामातील सर्वाधिक तापमान देखील असू शकते. शिवाय चंद्रपूर वाशिम जळगाव ब्रह्मपुरी या ठिकाणीही तापमान 43°c पेक्षा अधिक होते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, धुळे येथे देखील तापमान 42 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक होते.
मात्र आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 15 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ विभागापासून कर्नाटक गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा एक कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम हा राज्याच्या हवामानावर होत असून वळव्याच्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
तसेच दक्षिण कर्नाटक, दक्षिण तामिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले आहे. यामुळे देखील महाराष्ट्रात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. दरम्यान, याच हवामान प्रणालीमुळे आज महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस बरसणार असा अंदाज समोर येत आहे.
IMD ने म्हटल्याप्रमाणे, आज खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड लातूर, नांदेड, विदर्भ विभागातील यवतमाळ आणि गडचिरोली अशा एकूण 15 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.