Maharashtra Rain : एकीकडे महाराष्ट्रात तापमान वाढ पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू असल्याचे चित्र आहे. एकंदरीत राज्यात मिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्रात सूर्य अक्षरशः आग फेकत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 40°c पेक्षा अधिक आहे.
काही ठिकाणी 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान वाढले असून यामुळे यंदाचा उन्हाळा हा चांगलाच तापदायक ठरू लागला आहे.
विशेष म्हणजे ही तर तापदायक उन्हाळ्याची सुरुवात आहे आणखी दोन महिन्यांचा कालावधी जाऊ देणे बाकी आहे. यामुळे आगामी काळात उन्हाची तीव्रता आणखी वाढेल असे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे राज्यातील अनेक भागात रात्री देखील मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. रात्रीच्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हवामान खात्याने गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
आज देखील विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून राज्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे बरसणार पाऊस ?
गेल्या दोन ते तीन दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या छत्तीसगड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर जोरदार चक्राकार वारे वाहत असल्याचे दिसत आहे.
त्यापासून विदर्भ, अंतर्गत कर्नाटक, ते अंतर्गत तामिळनाडू पर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा एक कमी दाबाचा पट्टा सुद्धा सक्रिय झाला असून याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र पाहायला मिळतय.
विदर्भ, खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अगदीच तुरळक ठिकाणी गेल्या दोन दिवसांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे आज देखील वादळी पावसाची शक्यता कायम आहे.
आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस असून आज विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्थातच मार्च महिन्याची सुरुवात जशी पावसाने झाली तासाचा आता मार्च महिन्याचा शेवट देखील पावसानेच होणार आहे.
आज अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे. या पार्श्वभूमीवर या सदर सात जिल्ह्यांसाठी आज आयएमडीने येलो अलर्ट दिलेला आहे.