Maharashtra Rain : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात वळवाचा पाऊस सुरु आहे. यामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. एक तर आधीच बाजारात शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. सोयाबीन, कापूस समवेतच कांदा व भाजीपाला पिकांचे भाव गडगडले आहेत.
फळ पिकांना देखील बाजारात अपेक्षित असा भाव नाहीये. अशातच, आता राज्यात वळवाचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांच्या पार पोहचला आहे.
यामुळे उकाड्याने अक्षरशा अंगाची लाहीलाही होत आहे. तर दुसरीकडे वळवाचा पाऊस राज्यात त्राहीमाम माजवत आहे. आज देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवार पर्यंत राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे.
आज अर्थातच 20 एप्रिल 2024 ला राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सदर भागांमध्ये काही ठिकाणी वादळी वारे वाहतील असे देखील आयएमडीने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून आज राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात उन्हाचा चटका हा कायम राहणार आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट देखील येऊ शकते असे म्हटले जात आहे.
एकंदरीत गेल्या 9 ते 10 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला ऊन पावसाचा खेळ आणखी काही दिवस सुरूच राहणार अशी शक्यता आता व्यक्त होत आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, सध्या मराठवाडा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झालेली पाहायला मिळतं आहे.
तसेच यापासून कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत, यामुळे कमी दाबाचा पट्टा आहे तो सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच हवामान प्रणालीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वळवाचा पाऊस सुरू आहे.
या वळव्याच्या पावसाने काल कोल्हापूर जिल्ह्यात तुफान धुडगूस घातला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वारे आणि जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज देखील राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, आज खानदेशातील धुळे, जळगाव मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या बारा जिल्ह्यांमध्ये वळवाचा पाऊस हजेरी लावू शकतो.
यामुळे या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी आपला हार्वेस्टिंग झालेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा आणि पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकारांनी केले आहे.