Maharashtra Rain : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात गारठा कमी झाला आहे. हिवाळ्यात गारठा कमी झाला असल्याने आणि राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी मात्र वाढलेली आहे. सध्या राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान आहे.
ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांसाठी घातक ठरू शकतो असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागू शकतो असा अंदाज आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने आज देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
एकीकडे भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आलेली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रासहित देशातील इतर काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे.
यामुळे देशात नेमका हिवाळा सुरू आहे, पावसाळा सुरू आहे की हिवसाळा सुरू आहे हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
विशेष म्हणजे राज्यातील उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित भागात किमान तापमान हे 14 ते 20 अंश पर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच किमान तापमानात वाढ झालेली आहे.
यामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. दरम्यान आज देखील राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहणार असा अंदाज आहे.
तसेच आज राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती कायमचं आहे.
तसेच तेथून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत तयार झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. शिवाय दक्षिण गुजरातपासून उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्याचे सांगितले आहे.
तसेच या परिस्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याचे IMD ने म्हटले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने दिला आहे.