Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला होता. यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात जोरदार मोसमी पाऊस देखील झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात. अनेकांनी कमी पाऊस झालेला असतानाचं पेरणीचा निर्णय घेतला.
दरम्यान, 12 ते 20 जुलै या कालावधीत महाराष्ट्रात पावसाचा खंड पाहायला मिळाला. या आठ दिवसांच्या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप होती. तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमालीचा कमी झाला होता.
पण या खंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर थोडा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तथापि राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आणि कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतीय हवामान खात्याने आज मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
कुठे बरसणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावर पावसाच्या ढगांची दाटी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कोकण किनारपट्टी लगत मोठ्या प्रमाणावर बाष्प जमा होत आहे. याचा परिणाम म्हणून कोकणा आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
त्यामुळे आज कोकणातील आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय मुंबईसह ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, गडचिरोली या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय आज विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
या विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार अशी शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना परभणी छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ बाबत बोलायचं झालं तर विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अधिक पोषक परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, भंडारा, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला देखील आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.