Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा खंड पाहायला मिळाला. जुलै चा पहिला आठवडा हा जवळपास कोरडाच होता. राज्यात कुठेच या कालावधीत जोरदार पाऊस झाला नाही. एकतर जून महिन्यात कमी पाऊस झाला होता आणि जुलै महिन्याची सुरुवातही खराब झाली होती.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत होते. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांची ही चिंता आता दूर झाली आहे. कारण की, आता राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान हवामान खात्यातील तज्ञांनी आगामी काही दिवस राज्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान खात्यातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, आज आणि उद्या कोकणात अति जोरदार, विदर्भात जोरदार, खानदेशात मध्यम ते जोरदार आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता आहे.
तसेच परवापासून अर्थातच 14 जुलैपासून ते 18 जुलै पर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तिथे जसा पाऊस सुरू आहे त्यापेक्षा जोराचा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
एकंदरीत 14 जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हवामान खात्याने देखील आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच 15 जुलै पर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 12 जुलैला उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट राहणार आहे.
उद्या अर्थातच 13 जुलैला मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट राहणार आहे. 14 जुलैला दक्षिण कोकणातील सर्व जिल्हे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट राहणार आहे.
15 जुलैला देखील दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट राहणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट राहणार आहे.