Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने दीपोत्सवात महाराष्ट्रात पाऊस पडणार असा अंदाज नुकताच जारी केला आहे. हवामान खात्याने राज्यात एक नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरे तर मान्सून माघारी फिरल्यानंतर महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पाऊस झाला होता.
मान्सून नंतर झालेल्या या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे आहे. मात्र दिवाळीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या शेती कामांचे नियोजन पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच आखावे असा सल्ला देण्यात आला आहे. खर तर, सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग आला आहे.
अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका सारख्या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही पिकांची पेरणी बाकी आहे. अशा परिस्थितीत जर दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात पाऊस झाला तर रब्बी हंगामातील पीक पेरणीला फटका बसण्याची शक्यता आहे.
तथापि, या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा देखील होऊ शकतो. विशेषता कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर राहील असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, आता आपण भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. पहाटे पहाटे गारवा जाणवत आहे, दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत आणि सायंकाळी ढगाळ हवामानासारखी परिस्थिती काही भागात पाहायला मिळतेय.
यातच आता राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आज विदर्भात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील दक्षिणेकडील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या तीन जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि मराठवाडा विभागातील लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागातील संबंधित 13 जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.