Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झालाय. 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर, 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस झाला होता. सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात देखील राज्यात चांगला पाऊस झाला.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच एक ऑक्टोबरला राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे. आज राज्यातील जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
कुठे बसणार मुसळधार पाऊस?
खरंतर, मान्सूनचा परतीचा प्रवास हा चांगलाच रखडला आहे. परतीच्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसात कोणतीच प्रगती केलेली नाही. पण आता पुन्हा एकदा मान्सूनचा परतीचा प्रवास सक्रिय होणार असे चित्र आहे.
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला असून या संबंधित जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) जारी झालेला आहे.
परंतु उर्वरित राज्यात मुख्यता पावसाची उघडीप राहणार अन तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये आज कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला आहे.
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या अनुषंगाने या चारी जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे अहमदनगर पुणे सातारा बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मात्र या जिल्ह्यांना कोणताचं अलर्ट देण्यात आलेला नाही.
पण येथे राज्याच्या उर्वरित भागांच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. म्हणजेच आज राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहणार असे म्हटले गेले आहे.