Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरंतर, मुसळधार पाऊस बरसल्यानंतर राज्यातील पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून कमी झाला होता. पण, आज हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सध्या मॉन्सूनच्या परतीचा प्रवास अडखळला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस थांबला आहे, राज्यात पावसाने उघडीप दिली आहे.
मात्र, आज पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे. राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने आज महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आपल्या नवीन बुलेटिन मध्ये दिला आहे. या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.
कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार जोरदार पाऊस?
सध्या महाराष्ट्रात सुगीचे दिवस सुरू आहेत. सोयाबीन उडीद सारख्या सर्वच खरीप हंगामातील पिकांची काढणी केली जात आहे. अशा परिस्थितीत, जर पाऊस झाला तर नक्कीच शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानच केले आहे. मात्र आता गत दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
आज सप्टेंबर महिन्याच्या सांगतेला कोकणातील दक्षिणेकडील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर या 6 जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज समोर आला आहे.
या अनुषंगाने या संबंधित सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि मराठवाड्यातील नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये ही पावसाचा अंदाज आहे. येथे अगदीच तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे या संबंधित जिल्ह्यांना कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाही. उर्वरित राज्यात मात्र आज पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित 28 जिल्ह्यांमध्ये आज मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याने आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे.