Maharashtra Rain : जुलैच्या सुरुवातीला मोसमी पावसाने ब्रेक घेतला होता. यामुळे सर्वांच्याच काळजाची धडधड वाढली होती. पण, मध्यंतरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अगदी ढगफुटी सारखा पाऊस झाला. मात्र काही भाग अजूनही कोरडेठाक आहेत ही वस्तुस्थिती आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त आहेत.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र मोसमी पावसासाठी पूरक ठरत असल्याने पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती दिली आहे. तसेच हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
आज राज्यातील कोकण विभागात, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरावर आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या विभागातील संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. खरेतर गेल्या 24 तासात विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस झाला आहे.
या भागात पावसाचे विक्राळ स्वरूप पाहायला मिळाले आहे. येथे अगदीच पावसाचे तांडव सुरु आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये 100 मिलिमीटर पेक्षा अधिकचा पाऊस झाला.
विशेष बाब अशी की, विदर्भातील लाखांदूर येथे सर्वाधिक 245 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यावरून विदर्भात पावसाचा जोर अधिक असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान आजही विदर्भात आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
आज भारतीय हवामान खात्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून यासंबंधीत जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय मुंबईसह कोकणातील उर्वरित जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यातील जालना आणि परभणी तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे.
एकंदरीत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नक्कीच बळीराजाला दिलासा मिळणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस नवीन संजीवनी देण्याचे काम करणार आहे.